पुणे : रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प १५ एप्रिलपासून बंद आहेत. त्यामुळे पुण्यातील गृहनिर्माण प्रकल्पांसह पायाभूत सुविधा प्रकल्प अडचणीत आले आहेत. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आरएमसी प्रकल्प चालकांची बैठक घेतली. आता आरएसी प्रकल्पांना नवीन नियमावलींचे पालन करण्यास एकही दिवस मुदतवाढ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. तसेच, आरएमसी प्रकल्पांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांशी समन्वय साधून तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरएमसी प्रकल्पचालकांची बैठक कदम यांनी सोमवारी घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘आरएमसी प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. आरएमसी प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंडळाने नवी नियमावली लागू केली. या अंमलबजावणीसाठी मंडळाने प्रकल्पांना मार्चपर्यंत वेळ दिला होता. यापुढे या प्रकल्पांना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी आणखी वेळ दिला जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्या आरएमसी प्रकल्पांवर कारवाई केली जाईल.’
आरएमसी प्रकल्पांच्या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून परवानगी मिळण्याबाबत काही अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी मंडळाचे अधिकारी महापालिकांशी समन्वय साधून त्यावर तोडगा काढतील. आरएमसी प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यास आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी आरएमसी प्रकल्पचालक, विकासक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत चर्चा केली जात आहे. पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन पावले उचलण्यात येत आहेत,’ असे कदम यांनी नमूद केले.
तोपर्यंत आरएमसी बंदच
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. मात्र, या अंमलबजावणीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांची परवानगी घ्यावी लागते. सध्या मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यावर तोडगा काढण्याची मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. पुण्यातील आरएमसी प्रकल्पातील उत्पादन 15 एप्रिल पासून बंद करण्यात आले आहे एकसमान नियमावली लागू होईपर्यंत प्रकल्प सुरू केले जाणार नाहीत, असे पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले.
