पुणे : शहरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवार पेठेतील मालधक्का चौक, तसेच पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंतराव मारोतराव मगरे (वय ७३, रा. व्हिलशायर सोसायटी, वाघोली-केसनंद रस्ता, मूळ रा. यवतमाळ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत मगरे यांचा मुलगा आनंद (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव मगरे मूळचे यवतमाळचे आहेत.
त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे. मगरे मुलाकडे राहण्यासाठी आले होते. २१ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास मगरे हे नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून निघाले होते. गिरीराज ज्वेलर्ससमोर ते रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात मगरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत.मंगळवार पेठेतील मालधक्का चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी भांगरे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (२२ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पादचारी तरुण मालधक्का चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष असून, त्याची ओळख पटविण्यचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.
नगर, सोलापूर रस्ता धोकादायक
शहर परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगर रस्ता, सोलापूर रस्ता गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद, सोलापूर रस्त्यावरील हडपसर, शेवाळवाडी, लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगर रस्ता, सोलापूर रस्ता अहोरात्र गजबजलेला असते.
