पुणे : शहरातील रस्ते हे मृत्यूचा सापळा बनत चालले असून, गेल्या चार महिन्यांत रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये ९६ जणांचे बळी गेले. ट्रक, टँकर, सिमेंट मिक्सर आणि मालवाहू वाहने वेगाने चालविण्यात येत असल्याने या वर्षात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. टँकरचालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने टँकरमध्ये मदतनीस (क्लीनर) ठेवावा आणि टँकरवर ३६० अंशांत फिरणारे कॅमेरे बसावेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

शहर परिसरात गेल्या १५ दिवसांत पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. वानवडी परिसरात एका दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. हडपसरमधील महंमदवाडीत दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवकाचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी (२५ एप्रिल) बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर टँकरच्या धडकेत हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात टँकरचालक, मालक, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच नागरिक सहभागी झाले होते.

या बाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव म्हणाले, ‘शहर परिसरात जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत ९६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. ट्रक, टँकर, सिमेंट मिक्सर, मालवाहू वाहनांच्या धडकेत ३० जणांचा मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांत टँकरच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघातामागे बेदरकारपणा, तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणे हे प्रमुख कारण आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, या विचाराने वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत सातत्य ठेवण्यात आले आहे.

मद्यपी वाहनचालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. अचानक शहराच्या वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे, तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून अचानक तपासणी करण्यात येते.’

शहरात अवजड वाहनांमुळे झालेले प्राणांतिक अपघात

  • अपघात मृत्यू
  • जानेवारी ८ ८
    फेब्रुवारी ६ ६
  • मार्च ११ ११
    एप्रिल ६ ६

(आकडेवारी एप्रिल महिनाअखेरपर्यंतची)

गंभीर स्वरूपाच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी टँकर चालक, मालकांशी संवाद साधून त्यांना सूचना दिल्या आहेत. वेग आणि चालकांच्या बेदरकारपणामुळे अपघात होतात. अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. हेम्लेट परिधान केल्यास गंभीर स्वरूपाची इजा होत नाही. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. टँकरचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. टँकरमध्ये मदतनीस (क्लीनर) ठेवावा, तसेच ३६० अंशांत फिरणारे कॅमेरे टँकरवर बसवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग