पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी पाचशेहून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून बेरोजगारांना हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. मात्र, शिक्षक व पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या रोजगार मेळाव्यांवर गदा आली आहे.
याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी सांगितले की, ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ उपक्रमांतर्गत राज्यभरात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी पाचशेहून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आलेहोते. त्यात पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हे मेळावे पुढे ढकलण्यात आले आहेत याबाबत जिल्ह्यातील संबधित महाविद्यालय, विद्यार्थी, नोकरी इच्छुक युवक-युवती, औद्योगिक संघटना, मनुष्यबळ प्रतिनिधी, उद्योजक व आस्थापनांनी याची नोंद घ्यावी. रोजगार महाकुंभ मेळाव्याची सुधारित तारीख निश्चित झाल्यानंतर त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
उद्योगांचा मोठा सहभाग
पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध उद्योग आणि आस्थापनांचा सहभाग होता. या आस्थापनांकडून विविध शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराच्या स्वरूपानुसार रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. पुणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण ३० मेळावे २९ सप्टेंबरला होणार होते. त्यातून नोकरीच्या हजारो संधी तरुणांना उपलब्ध होणार होत्या. मात्र, आचारसंहितेमुळे हे मेळावे आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहेत.
रोजगार महाकुंभचा उद्देश
युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा रोजगार महाकुंभ उपक्रमामागे आहे. देशातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू यामागे आहे. या उपक्रमातून युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर उद्योग व विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि शासन, उद्योग-आस्थापना तसेच रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकाच मंचावर आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
