पुणे : शहरातील रिक्षाचालकांकडून मीटर पद्धतीने भाडे न आकारता मनमानी भाडे आकारणाऱ्या १७५ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहा रिक्षाचालकांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आलेे असून, उर्वरित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईतून सुमारे ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य परिवहन विभागाच्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत रिक्षाचालकांना प्रवासी भाडे आकारण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांसाठी पहिल्या १.५ किलोमीटरसाठी २६ रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७.१४ रुपये अशी दरआकारणी निश्चित करून दिली आहे.

त्यापेक्षा अवाजवी भाडे आकारण्यास बंदी घालण्यात आली असून, प्रवाशांची अडवणूक न करता मीटरप्रमाणेच सेवा देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत जनजागृती करून रिक्षामध्ये दर्शनी भागात मीटरच्या दराबाबत फलकही लावावा, अशा सूचना दिल्या आहेत.मात्र, अनेक रिक्षाचालकांकडून आरटीओच्या नियमांना बगल देत थेट मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे.

अनेक बेशिस्त रिक्षाचालकांकडून प्रवासी भाडे आकारणीवरून अडवणूक करून प्रवाशांबरोर हुज्जत, भांडणे, उद्धट वर्तन, मीटरमध्ये फेरफार करून जादा भाडे आकारणी केली जात आहे. अशा बेशिस्त रिक्षाचालकांबाबत वारंवार तक्रारी वाढल्या असताना आरटीओ प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. जानेवारी महिन्यात ४७७ रिक्षांची तपासणी करण्यात आली.

त्यांपैकी १७५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा रिक्षाचालकांचे परवाने तात्पुरते निलंबिल करण्यात आले आहेत. उर्वरित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे ५५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

कारवाईचे स्वरूप

कारवाईमध्ये जादा भाडे आकारलेले २९, मीटरमध्ये छेडछाड करून जादा भाडे आकारणारे १०, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे १, नियमापेक्षा जादा भाडे आकारणारे १०, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन कऱणारे १७ आणि इतर सूचनांचे पालन किंवा फलक न लावणे अशा कारणास्तव अशा एकूण १७४ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्याबाबत निर्देश देण्यात आले असून, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांनी अडवणूक केल्य़ास थेट ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार, छायाचित्र आणि नंबर पाठवावा. प्राप्त तक्रारींवर ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे.

  • स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</li>