पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्यासाठी देण्यात आलेली सहावी मुदत मंगळवारी (३० जून) संपल्यानंतर पहिल्या दिवशी (१ जुलै) पुणे विभागात ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाद्वारे ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच, ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांचे हस्तांतर, कर्जबोजा चढविणे-उतरविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी कामे थांबविण्यात आली आहेत. ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० जूनपूर्वी अर्ज केलेल्या वाहनांवर ही कारवाई करण्यात येणार नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातील नऊ लाख ४६ हजार ३१४ गाड्यांना ‘एचएसआरपी’ पाटी बसविण्यात आली असून, ११ लाख ५७ हजार वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’साठी अर्ज केले आहेत. त्यातील ११ लाख ४८ हजार ५४३ वाहनधारकांना अपॉईंन्टमेंट मिळाली आहे. पुणे विभागात सुमारे २४ लाख २८ हजार गाड्यांना ‘एचएसआरपी’ पाटी बसवणे बंधनकारक होते. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक आहे. त्यानंतर आलेली आणि सध्या येत असलेली नवी वाहने ‘एचएसआरपी’ लावूनच रस्त्यावर येत आहेत.

गेल्या वर्षी ‘एचएसआरपी’ लावण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर आणि ३० जूनपर्यंत सहावी मुदतवाढ देऊनही एचएसआरपी पाटी बसविण्याकडे वाहनधारकांकडून दूर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

‘नोंदणी केलेल्या वाहनधारकांना सूट’

अधिकृत पोर्टलवर ३० जूनच्या आधी ऑनलाइन नोंदणी करून नंबर प्लेट बसविण्याची अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना या कारवाईतून सूट देण्यात आला आहे. अशा वाहनांवर अपॉइंटमेंटच्या आधारे तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. तसेच वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ‘एचएसआरपी’ची अट लागू करण्यात आलेली नाही. ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्याचे तीन झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज, रिअल इंडस्ट्रीज आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स या अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.

तक्रारीसाठी संपर्क

मुदतीत अर्ज केलेल्या वाहनधारकांना ‘एचएसआरपी’ बसविण्याविषयी काही तक्रारी असल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांची काही कामेही थांबविण्यात आली आहेत. – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

‘एचएसआरपी’चे दर किती?

मुदतीपूर्वी नोंदणी केलेल्या वाहनधारकांसाठी ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटचे दर निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर कार तसेच हलकी, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कात फिटमेंटचा समावेश असून जीएसटी स्वतंत्रपणे लागू होईल, अशी माहिती परिहवन विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.