पुणे : ‘नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास हा सांघिक प्रयत्नांचा भाग होता. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करुन सखोल तपास करण्यात आला. या घटनेचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला. अवध्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र दाखल केले. संवेदनशील खटल्यात विक्रमी वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात आले’, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला गुरुवारी विशेष न्यायालायने दोषी ठरविले. आरोपीला दोषी ठरविल्यानंतर पोलीस अधीक्षक गिल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नसरापूर अत्याचार प्रकरणातील विशेष सरकारी वकील अजय मिसर, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने, तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार या वेळी उपस्थित होत्या. गिल म्हणाले, ‘नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त पडसाद उमटले. नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग रोखून धरला. नसरापूर परिसरात बंद पाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपासासाठी सात पथके तयार केली. प्रत्येक पथकात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तपास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत करुन १४ मे रोजी १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले ’

‘न्यायवैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्षदर्शी तीन मुलांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. पोलिसांनी आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले’, असे त्यांनी नमूद केले.

नागरिकांचा राग; ‘पंचनामाा व्हिसी’द्वारे

अत्याचार प्रकरणानंतर एक मे रोजी मध्यरात्री आरोपी भीमराव कांबळे याला पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले. त्यानंतर दुसऱ्यांदा पंचनामा करण्याची गरज भासली. नसरापूरमधील ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यानंतर आम्ही या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन ‘व्हिडीओ काॅन्फरसिंग’द्वारे दुसरा पंचनामा केला. पुरावा, घटनाक्रमाची साखळी, घटनेची पुनर्रचना (रिक्रएशन सीन) अशा बाबी तपासात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले, असे पाेलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.