पुणे : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांकडून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडगाव मावळ, लोणावळा येथे अत्याधुनिक लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे भरधाव वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. ‘महामार्गावर होणारे बहुंताश अपघात वेग आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे घडतात. बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई, तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा, वडगाव मावळ परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ब्लूमबर्ग फिलान्थ्राॅपीज इनिशिएटिव्ह फाॅर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप या संस्थांकडून सहाकार्य करण्यात आले आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
‘लोणावळा, वडगाव मावळ परिसरात तीन ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे दिवसा आणि रात्रीही कार्यान्वित राहतात. कॅमेऱ्यांकडून वाहनांचा अचूक वेग नोंदविला जातो. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा ३२० किलोमीटर प्रतितासापर्यंतचा वेग नोंदविण्याची क्षमता या उपकरणांमध्ये आहे’, असे गिल यांनी नमूद केले.
अपघातात पादचारी, दुचाकीस्वारांचे मृत्यू
पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भरधाव मोटार, ट्रक चालकांविरुद्ध कारवाईसाठी अशा प्रकारचे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.
वडगाव मावळ, लोणावळ्यात प्रायोगिक तत्वावर हे कॅमेरे बसविण्यात आले आहे. हे कॅमेरे वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र, तसेच चित्रीकरण करु शकतात, तसेच हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, वाहन चालविताना मोबाइलचा वापर अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करणे शक्य होणार आहे. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण
