पुणे : पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. हेही वाचा - देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन हेही वाचा - कांद्याचे दर कोसळले; जाणून घ्या, नाफेड, ‘एनसीसीएफ’ कांद्याची विक्री कधी, कुठे करणार राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता होती. गुरुवारी रात्री गृहविभागाने यात काही पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, मावळते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गिल यांची पुण्यात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. शहराचा मध्यभाग आणि पेठांचा परिसर असणाऱ्या परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हे अतिशय महत्वाचे पद समजले जाते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात गिल यांच्या कामगिरीचा देखावा साकारण्यात आला होता. परिमंडळ एकमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यासोबत त्यांनी महत्त्वाचे गुन्हे आणि आंदोलनेही यशस्वीरित्या हाताळले आहेत.