पुणे : पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली असून, एकूण १०४ टँकरद्वारे १११ गावे आणि ४२६ वाड्यांतील सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा झाल्यास टँकरची संख्याही वाढण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासनाकडून ८७ विहिरींचे संपादन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांतील १११ गावे आणि ४२६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, एकूण नऊ तालुक्यांतील १ लाख ७३ हजार ५२९ नागरिकांना गेल्या आठवड्यापर्यंत १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. ही संख्या काही प्रमाणात वाढली असून, ती पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच, ३०३० पशुधनाला ही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांनाही वेग देण्यात आला आहे. त्यासाठी ४३ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी २.५६ कोटी रुपयांचा खर्च करून ६११ कूपनलिकांच्या (बोअरवेल) दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन ३१ नवीन कूपनलिकांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी २५.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चौकट

तालुक्यातील टँकर्सची स्थिती

तालुका – टँकर संख्या – लोकसंख्या

आंबेगाव – २५ – ३९,५०७
भोर – ०८ – १३,६८६
दौंड – ०१ – १,६००
हवेली – ०८ – ७,१०९
इंदापूर – ०६ – २०,५०३
जुन्नर – २० – २३,९८१
खेड – १४ – २७,४५८
पुरंदर – १० – १३,६६०
शिरूर – १२ – २६,०८८
एकूण – १०४ – १,७३,५२९

पुणे विभागातील सव्वातीन लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा

विभागातील पुण्यासह, सातारा, सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख लोकसंख्येला २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये २०८ गावे आणि ७७६ वाड्या-वस्त्यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विभागातील १६८ विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात ६२ आणि सांगली जिल्ह्यातील १९ खासगी विहिरी जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.