पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, सध्या जिल्ह्यातील ५ गावांना आणि ५३ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यातून सुमारे १८ हजार ६५० नागरिकांची तहान भागवली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८१९ मिमी पाऊस झाला असून, सरासरीच्या सुमारे ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील टंचाईच्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार नवीन टँकर मंजूर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. खासगी संपादनांतर्गत विहिरी आणि बोअरवेलचे संपादन करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश टँकरखेपा नियोजनाप्रमाणे पूर्ण करण्यात येत असून, पाणीपुरवठ्याची स्थिती समाधानकारक ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी शासनाकडून ३३ नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच, स्रोत बळकटीकरणासाठी १० कामे आणि विहीर खोल करणे आणि गाळ काढण्याच्या २१ कामांनाही मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रादेशिक योजनांमध्ये मोरगाव आणि शिवरी या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी ६११ विंधन विहिरी (बोअरवेल) दुरुस्ती कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी अंदाजे २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बंद पडलेल्या किंवा कमी क्षमतेने सुरू असलेल्या बोअरवेल पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन २९४ नवीन बोअरवेल योजनांना मंजुरी देण्यात आली. या कामांसाठी अंदाजे २४.९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्व संबंधित विंधन विहिरींची खोदाई पूर्ण झाली आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत. तसेच, येत्या जूनपर्यंतची संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
