पुणे : फ्लेक्स प्रिटींग करणाऱ्या दुकानात आग लागल्याची घटना सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर मध्यरात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत फ्लेक्स प्रिटींग यंत्र, कच्चा मालासह अन्य साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणली.
कुमठेकर रस्त्यावर लकी काॅपिअर्स हे फ्लेक्स प्रिटिंग दुकान आहे. रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या कसबा पेठ, एरंडवणे अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. पाच मजली इमारतीत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लकी काॅपिअर्स हे दुकान आहे. तेथे फ्लेक्स प्रिटिंग करुन दिले जातात.
अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, तांडेल हरीश बुंदेले, मुश्ताक शेख, राजेंद्र महाडिक, दत्तात्रय सहाणे, सनी लोखंडे यांच्यासह जवानांनी पाण्यााचा मारा करुन आग आटोक्यात आणली. पंधरा ते वीस मिनिटांत आग आटोक्यात आल्यानंतर जवानांनी दुकानातील अंतर्गत भागाची पाहणी केली. आगीची झळ प्रिटिंग यंत्रणा, तसेच कच्च्या मालाला पोहोचली होती.
दुकानात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. या इमारतीतील रहिवाशी आग लागल्यानंतर घाबरले होते. मध्यरात्री अडीचपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तेथून रवाना झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
