पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी शिवाजीनगर भागातील साखर संकुल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशखिंड रस्त्यावरील कृषी महाविद्यालय चौक ते नरवीर तानाजीवाडी (वाकडेवाडी) परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
‘ऊस उत्पादक शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी साखर संकुल येथे हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. साखर संकुल, तसेच नरवीर तानाजीवाडी येथील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी दहानंतर आवश्यकतेनुसार वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
कृषी महाविद्यालय चौकातून नरवीर तानाजीवाडीकडे रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय चौकातून नरवीर तानाजीवाडीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी वेधशाळा चौकातून इच्छितस्थळी जावे. नरवीर तानाजीवाडी येथील भुयारी मार्गातून साखर संकुलकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संचेती चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
