पुणे : एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी निकाली काढला. वकिलांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यात यश आले.

या प्रकरणातील दाम्पत्याचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना विवाहानंतर चार अपत्ये झाली. संसारही सुखात चालला होता. मात्र, वैचारिक वाद, कुरबुरी दाम्पत्यामधील तणाव वाढला. नातेवाईकांनी दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दोघांमधील मतभेद दूर झाले नाहीत. त्यानंतर पत्नी माहेरी गेली. पती व्यवसाय करत होता. त्याने चार मुलांची जबाबदारी स्वीकारली.

घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सहा महिन्यांच्या सक्तीच्या प्रतीक्षा कालावधीस न्यायालयाने सूट दिली. त्यानंतर दोघांचे एकाच दिवशी समुपदेशन करण्यात आले. आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करण्यात आला. घटस्फोटानंतर चार मुलांचा ताबा वडिलांकडे देण्यात आला आहे. पत्नीने पोटगीचा हक्क स्वेच्छेने सोडून दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. जान्हवी भोसले, ॲड. भालचंद्र धापटे, ॲड. राहुल पोल यांनी काम पाहिले. न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दोन्ही पक्षांची सहमती, न्यायालयीन प्रक्रियेतील अचूकता, निर्णयामुळे एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यात आला. अशा प्रकारे घटस्फोटाचे दावे निकाली काढले गेल्यास न्यायालयाचा वेळही वाचेल, तसेच दाव्यांचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होईल. हे प्रकरण मार्गदर्शक ठरले आहे, असे ॲड. भोसले, ॲड. धापटे, ॲड. पोल यांनी नमूद केले.