पुणे : नात्यातील महिलेच्या मोबाइलवर संदेश पाठविल्याने झालेल्या वादातून एकाचे पुण्यातून अपहरण करून सांगलीत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली.

गोविंद माधवराव उपासे (वय ५९, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (वय २८, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. याबाबत रोहित गाेविंद उपासे (वय ३५, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद उपासे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास मित्रांबरोबर सिंहगड रस्ता भागातील धायरी येथे जेवायला गेले होते. जेवण करून ते रात्री घरी आले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास उपासे यांच्या मोबाइल क्रमांकावर आरोपींनी संपर्क साधला. मित्रांबरोबर जाऊन येतो, असे सांगून ते घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर उपासे घरी परतले नाहीत. वडील बेपत्ता झाल्यानंतर मुलगा जयवंत याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नांदेड सिटी पोलीस ठाण्यात ११ ऑगस्ट रोजी दिली.

सांगली शहरातील शामरावनगरमधील घोड्याच्या तबेल्याजवळ भांडणे सुरू असल्याची माहिती १२ ऑगस्ट रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी केंगार, बाबर, सावंत यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघा आरोपींनी पुण्यातून गोविंद उपासे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. उपासे यांना मारहाण करून मृतदेह कडेगावातील कालव्यात टाकून दिला, तसेच त्यांची दुचाकी कात्रजमधील आंबेगाव परिसरात लावल्याचे आरोपींनी सांगितले. या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांनी नांदेड सिटी पोलिसांना दिली.

पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा उपासे यांना मारहाण करून मोटारीतून तिघे आरोपी पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले. आंबेगाव परिसरातून त्यांचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कडेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी सोपविला.

‘या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नात्यातील एका महिलेला मोबाइलवर संदेश पाठविल्याने आरोपींनी खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे,’ असे आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.