पुणे : लोणी काळभोर भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सारसबाग परिसरात लावलेल्या मोटारीत सापडल्याची घटना उघडकीस आली. बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असून, या प्रकरणाचा स्वारगेट पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

शुभरत बाळासाहेब बनसोडे (वय २५, रा. कवडीपाट, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. ‘शुभरत हा पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो जमीन खरेदी-विक्री व्यवहार करायचा. तो बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. त्याच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल’, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.

२६ ऑक्टोबर रोजी शुभरत हा दुपारी बाराच्या सुमारास रिक्षाचालक वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी घेऊन घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने मित्र सौरभ कडू यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्याला हडपसर गावात भेटण्यासाठी बोलाविले. सौरभची भेट घेतल्यानंतर शुभरत पुन्हा तेथून निघाला. त्यानंतर त्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. त्याचा भाऊ शुभम याने त्याच्याशी संपर्क साधला होता. तो बेपत्ता झाल्यानंतर शुभम आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर शुभमने २८ ऑक्टोबर रोजी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शुक्रवारी (३० ऑक्टोबर ) सकाळी सारसबाग परिसरातील दादावाडी जैन मंदिरासमोर लावलेल्या मोटारीतून वास येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीतील पाठीमागील आसनावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला होता. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. तेव्हा मोटार हडपसरमधील अविनाश गायकवाड यांची असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा शुभरत मोटार घेऊन गेल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्याच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारची जखम आढळून आली नाही. पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

मोटारीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटविण्यात आली आहे. तो साेमवारी रात्री सारसबाग परिसरात मोटारीतून आल्याचे दिसून आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूमागचे कारण समजेल. – यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे</strong>