पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पेशवे पार्क ( सारसबाग) ते पर्वती असा रोप वे प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे महापालिकेने हा रोप वे प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या या रोप वे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र भाजप बरोबर राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्षांनी मात्र हा रोप वे प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगत याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार की वादाच्या भोवऱ्यात अडकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

युवा सेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत बागुल यांनी सारसबाग ते पर्वती असा रोपवे करण्याचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याची भूमिका घेतली आहे. याचा पुनर्विचार करावा असे पत्र बागुल यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना पाठविले आहे. पुणे शहरात रोप वे सुरू करण्याची संकल्पना ही पर्यटनाच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह असून, पुण्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारा हा एक चांगला प्रकल्प ठरू शकतो. पुण्यात रोपवे सुरू करण्याची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मांडली होती. त्यामुळे पुण्यात रोप वे व्हावा, ही भूमिका निश्चितच सकारात्मक आहे. मात्र, सारसबाग ते पर्वती असा रोपवे करण्याचा प्रस्ताव व्यवहार्य वाटत नाही. या प्रस्तावाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

सारसबाग आणि पर्वती हा परिसर पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, पर्यटक आणि भाविकांची ये-जा असते. त्यातच या परिसरात सध्या पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत येथे रोप वे प्रकल्प झाल्यास वाहनांची संख्या आणि पर्यटकांची गर्दी आणखी वाढून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेषतः स्वारगेट हे पुण्याचे महत्त्वाचे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आहे. मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे या परिसरात आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी रोपवे प्रकल्पामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने या परिसरातील रस्ते मोकळे राहणे अत्यंत गरजेचे आहे. रोपवे उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी, उपलब्ध जागा, प्रवाशांची सुरक्षितता, पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणाम यांचाही सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

सारसबाग ते पर्वती या मार्गाऐवजी तळजाई टेकडी ते पर्वती असा रोपवे उभारण्याचा पर्याय अधिक योग्य ठरू शकतो. तळजाई टेकडी परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा आणि रोपवेच्या उभारणीसाठी जागेच्या उपलब्धतेचा विचार करता या पर्यायाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करावा.

यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण टाळता येईल, पार्किंगचा प्रश्न कमी होईल आणि पर्यटकांनाही रोपवेचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर पुण्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळू शकेल. त्यामुळे या प्रस्तावाचा फेरविचार करावा असे पत्र बागुल यांनी भीमाले यांना पाठविले आहे.

शिवसेनेची भूमिका नेहमीच विकासाच्या बाजूने पण….

शिवसेनेची भूमिका नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे. चांगल्या आणि शहराच्या हिताच्या प्रकल्पांना विरोध करणे ही शिवसेनेची भूमिका कधीच नव्हती. मात्र, विकास करताना नागरिकांच्या सोयी, शहराची वाहतूक व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. रोपवे प्रकल्प व्हावा, पण तो पुणेकरांच्या हिताचा आणि शहराच्या नियोजनाला पूरक असावा, हीच आमची भूमिका असल्याचे बागुल म्हणाले.