करोनामुळे पुण्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं परवानगी दिली होती. त्यानंतर १० आणि ११ मे रोजी एका करोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यात आले होते. ही व्यक्ती या उपचारानंतर बरी झाली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यांनी याबद्दल रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याबाबत माहिती दिली असून त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे.

“प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी प्लाझ्मा थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन,” अशा आशयाचं ट्विट मोहोळ यांनी केलं आहे. दरम्यान, २० मे पासून अन्य करोनाग्रस्तांवरही प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठात्यांकडून देण्यात आली.

पुणे जिल्हा प्रशासनानंही प्लाझ्मा थेरपीचा करोनाग्रस्त रुग्णांवर वापर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीची करोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. काही आठवड्यांपूर्वी केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यास आयसीएमआरनं (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) परवानगी दिली आहे.

आणखी वाचा- समजून घ्या सहजपणे : करोनामध्ये प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय?

मुंबईतही प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार

मंत्रालयातील एका विभागातील आयएएस महिला अधिकारीला करोनाचा संसर्ग झाला असून प्रकृती गंभीर असल्याने प्लाझ्मा थेरपी देण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरेपी दिलेल्या या शहरातील चौथ्या रुग्ण आहेत. या आयएएस अधिकाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे ७ मेला निदान झाले. त्यानंतर काहीच दिवसांत प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ब्रीचकॅण्डी रुग्णालयात दाखल केले. त्या ऑक्सिजन व्यवस्थेवर असून आयसीएमआरने सूचित केलेल्या विविध औषधांना त्या विशेष प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याचा निर्णय घेतला गेला. ब्रीचकॅण्डी रुग्णालयात १६ मे रोजी त्यांच्यावर ही उपचारपद्धती केली असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यास रुग्णालय प्रशासनाने मात्र नकार दिला आहे.

नायरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

नायर रुग्णालयात आत्तापर्यंत ३५ ते ४० वयोगटांतील दोन रुग्णांना ही उपचारपद्धती दिलेली असून दोन्ही रुग्णांमध्ये सुधारणा झालेली आहे. यातील एका रुग्णाला आता घरीदेखील सोडण्यात येईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.