पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागावरील ताण दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांत मिळून १५१ आयसीयू खाटा उपलब्ध असल्या, तरी दररोज ५ ते ६ गंभीर रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खाटांची सद्यःस्थिती कळावी यासाठी प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली असली, तरी तिला मिळणारा प्रतिसाद अल्प आहे. दुसरीकडे ऐन वेळी या हेल्पलाइनचा रुग्णांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ससूनची हेल्पलाइन कागदावरच राहिली आहे.
ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागातील बहुतांश खाटा सातत्याने भरलेल्या असतात. त्यामुळे अन्य रुग्णालयांतून गंभीर अवस्थेतील रुग्ण ससूनमध्ये आणल्यानंतर तातडीने आयसीयूची खाट उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. ससून हे पुणे, पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यातील विविध भागांतील गंभीर रुग्णांसाठी प्रमुख तृतीयस्तरीय उपचार केंद्र आहे. त्यामुळे अपघात, गंभीर संसर्ग, श्वसनविकार, हृदयविकार, अन्य गुंतागुंतीच्या आजारांतील रुग्णांचा मोठा भार येथे येतो. अनेकदा इतर रुग्णालयांतून रुग्णाला शेवटच्या क्षणी ससूनमध्ये नेण्यास सांगितले जाते. मात्र, त्या वेळी आयसीयू खाट उपलब्ध नसेल तर उपचार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात, असे ससूनच्या प्रशासनाने सांगितले.
हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
रुग्णाला ससूनमध्ये आणण्यापूर्वी अतिदक्षता विभागात खाटेची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी ९२२५३३०५३५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर दररोज तीन ते चार फोन येत असून, आतापर्यंत शंभर जणांनी अतिदक्षता विभागातील खाटेच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यांतून हे फोन आले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांनी किंवा संबंधित रुग्णालयांनी ससूनमध्ये रुग्ण हलविण्यापूर्वी हेल्पलाइनवर संपर्क साधून खाटेची उपलब्धता तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांची सद्यस्थिती
अतिदक्षता विभाग. एकूण खाटा व्यापलेली टक्केवारी
सर्वसाधारण – २६. ९३.३
ट्रॉमा – १६. ८९.६
शल्यचिकित्सा- ७. ८६.२
शिशु विभाग – ५९. ८६.०
श्वसन विकार- १२ ९१.६६
बालक. – .१०. ९०.०
बालक शल्यचिकित्सा – ६ ९०.०
भाजलेल्या रुग्णांसाठी. – ४. ७५.०
हृदय शस्त्रक्रिया. – ११. ३५.६
एकूण – १५१
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे काय?
हेल्पलाईन क्रमांक अनेकांना माहीत नसल्याने पुढील काळात याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात खाटा मिळाव्यात, यासाठी ससून रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.
रुग्णाला थेट रुगणालयात आणण्याआधी हेल्पलाईनवर नातेवाईकांनी संपर्क साधावा. रुग्णाला काय आजार आहे याचे तपशील द्यावे. ती माहिती संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवली जाते. त्यानुसार रुग्णाला खाटेची उपलब्धता कळवली जाते. बऱ्याचदा खाटेची उपलब्धता न पाहता बाहेर गावाहून रुग्ण रुग्णालयातच आणला जातो. अशा वेळी त्यांना प्रतीक्षा करावी लागते. असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी सांगितले.
