पुणे : अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांत रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. ससून सर्वोपचार रुग्णालयात मात्र अतिशय कमी खर्चात ही सुविधा रुग्णांना मिळत आहे. सध्या रुग्णालयात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या गरीब रुग्णांसाठी ससून आशेचा किरण ठरत आहे. ससूनमध्ये नुकतीच एका १३ वर्षांच्या मुलीवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मुलगी दौंड तालुक्यातील असून, गेल्या काही वर्षांपासून ती मूत्रपिंड विकाराने आजारी होती. तिचे दोन ते तीन वर्षांपासून डायलिसिस सुरू होते. सोलापूर येथील रुग्णालयात एका १३ वर्षांच्या मुलाला मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्याचे अवयव पुण्यातील तीन रुग्णालयांमधील चार रुग्णांना देण्यात आले आहेत. त्यात ससूनमधील १३ वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. या मुलीवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ससूनमधील डॉक्टरांसह मानद डॉक्टरांनी मोलाची भूमिका बजावली. हेही वाचा: पुणे : वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची बदली, राज्यातील उपायुक्त दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश ससूनमध्ये २०१६ मध्ये पहिल्यांदा मेंदुमृत व्यक्तीचे मूत्रपिंड रुग्णाला प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून रुग्णालयात अशा प्रकारच्या १५ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचबरोबर जिवंत दात्याचे मूत्रपिंड रुग्णाला प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया ससूनमध्ये पहिल्यांदा २०१८ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत १६ रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात एकूण चार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रुग्णालयात झाल्या आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. हेही वाचा: पुणे: कल्याणीनगर चौकात तरुणाला चिरडून पसार झालेला ट्रकचालक सात महिन्यानंतर अटकेत मुलामुळे चौघांना जीवदान सोलापूरमधील मेंदुमृत मुलाच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे या महिन्यात चार रुग्णांना जीवदान मिळाले. त्याचे अवयव पुण्यात आणून चार रुग्णांवर त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका रुग्णाला फुप्फुस देण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड आणि यकृत देण्यात आले. ससून रुग्णालयातील १३ वर्षांच्या मुलीला मूत्रपिंड देण्यात आले. पुणे विभागातील यंदाच्या वर्षातील हे ४० वे अवयवदान आहे.