पुणे; निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या नियमित आरोग्यसेवांवर बसल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेषतः नियोजित मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. मात्र, वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीने आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता विभागातील उपचार पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आल्याने गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला.

रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नियमितपणे दररोज सरासरी १,६२९ रुग्ण उपचारासाठी येतात. संपाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत १,४४७ रुग्णांनी ओपीडीची सेवा घेतली. त्यानंतर गुरुवारी ही संख्या वाढून २,१८७ वर पोहोचली.

अंतर्गृह रुग्ण विभागात (आयपीडी) दररोज सरासरी १,०३६ रुग्ण दाखल होतात. संपाच्या काळात या संख्येत फारसा फरक पडला नाही. ५ ऑगस्ट रोजी १,०२२, तर ६ ऑगस्ट रोजी १,०१७ रुग्ण दाखल झाले.

प्रसूती सेवांवरही काही प्रमाणात परिणाम झाला. नियमितपणे दररोज सरासरी २० प्रसूती होत असताना ५ ऑगस्ट रोजी १०, तर ६ ऑगस्ट रोजी १८ प्रसूती नोंदविण्यात आल्या.

दुसरीकडे, अतिदक्षता विभागातील उपचार मात्र पूर्ववत सुरू राहिले. नियमित सरासरी ९९ रुग्णांच्या तुलनेत ५ ऑगस्ट रोजी १०८, तर ६ ऑगस्ट रोजी ११३ गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले.

आकस्मिक विभागात नियमितपणे सरासरी १८१ रुग्ण उपचारासाठी येतात. बुधवारी ही संख्या ८२ पर्यंत घसरली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा वाढून १९८ वर पोहोचली.

संपाचा सर्वाधिक परिणाम शस्त्रक्रिया विभागावर झाला. नियमितपणे दररोज सरासरी ५७ मोठ्या शस्त्रक्रिया होत असताना ५ ऑगस्ट रोजी केवळ १६, तर ६ ऑगस्ट रोजी ३२ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लहान शस्त्रक्रियांच्याही संख्येत मोठी घट झाली. सरासरी १५९ शस्त्रक्रियांच्या तुलनेत ५ ऑगस्ट रोजी फक्त ३३, तर ६ ऑगस्ट रोजी ६३ लहान शस्त्रक्रिया पार पडल्या.

संपामुळे नियोजित शस्त्रक्रियांसाठी आलेल्या अनेक रुग्णांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र, वरिष्ठ डॉक्टर आणि उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपत्कालीन सेवा, ओपीडी आणि अतिदक्षता विभागातील उपचार सुरळीत सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारात कोणताही अडथळा येऊ दिला नाही, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी दिली.