पुणे : ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि सातारा जिल्ह्यात छापे टाकले. त्यामध्ये भेसळयुक्त पनीर, खवा, तूप आणि अन्य अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून केवळ पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागाने दाढीचे सत्र सुरू केले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा करण्यात येत असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाकडे गेल्या काही महिन्यांपासून भेसळीच्या तक्रारी येत होत्या त्याची दखल घेत प्रशासनाने पावले उचलली आहेत.
पुण्यात सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील १७ पनीर व खवाविक्रेत्यांवर प्रशासनाने एकाच वेळी धाडसत्र राबवले. या कारवाईदरम्यान ३५ नमुने विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. तसेच, खरेदीची बिले नसलेला आणि अस्वच्छ वातावरणात साठवलेला सुमारे ४७ लाख ३६ हजार १८ रुपयांचा साठा जप्त केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.सातारा जिल्ह्यातील माण आणि कराड तालुक्यांतही तूप, फरसाण व शेवविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
येथे ४ नमुने घेण्यात आले असून, २ लाख ५९ हजार ७२० रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि भेसळयुक्त अन्न उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पुण्यात जप्त केलेला माल
खवा : १३,१२७ किलो (३४,३५,१५२ रुपये)
पनीर : २,८०६ किलो (७,५५,६०५ रुपये)
तूप : ९६० किलो (५,१६,५३६ रुपये)
चीज ॲनालॉग : १३८ किलो (२८,७२५ रुपये)
