पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर हाती घेतलेली अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यात उड्डाणूपल, बोगद्यासह चार भुयारी मार्गांचा समावेश आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याचबरोबर नवीन खंबाटकी बोगदाही वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यामुळे पुणे ते सातारा प्रवास हा नजीकच्या काळात वाहतूक कोंडीमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे. यामुळे हा प्रवासाचा कालावधी एक तासावर येण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा महामार्गावर सातारा जिल्ह्यात अनेक कामे सुरू असून, त्यात आसले येथे कृष्णा नदीवरील पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून उजव्या बाजूचा पूल पूर्ण झाला आहे. सध्या भरावाचे काम सुरू असून डाव्या बाजूच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याचबरोबर वेळे परिसरात वाहन उड्डाणपूल आणि समतल विलगकाचे काम सुरू आहे.

समतल विलगकाच्या कामासाठी केलेल्या उत्खननामुळे मुख्य मार्गिकेवरील वाहतूक सध्या सेवा रस्त्यावर वळविण्यात आली आहे. खंबाटकी बोगद्याच्या डाव्या बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील कामांमध्ये किकवी येथे दोन पदरी मार्गाचे तीन पदरीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, हरिश्चंद्री येथे वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शिवरे येथे वाहनांसाठीच्या भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण होऊन तो गेल्या वर्षी ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

तसेच खेडशिवापूर येथील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झाले असून, तो गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आली आहे. वाकड परिसरात मुठा नदीवरील पुलाचे कामही वेगाने सुरू आहे. उजव्या बाजूचा पूल पूर्ण होऊन तो मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डाव्या बाजूच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. किवळे येथे लहान वाहनांसाठी भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असून तिथे भरावाची कामे सुरू आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

स्वामिनारायण मंदिर ते रावेत उन्नत मार्ग

पुणे ते बंगळुरू हा महामार्गावरील भविष्यातील वाढती वाहतूक आणि कोंडी लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. कात्रजमधील स्वामिनारायण मंदिर ते रावेत असा उन्नत मार्ग असेल. सध्या हा आराखडा मंजुरीसाठी प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे दिल्लीत पाठविण्यात आला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर हे काम लवकरच सुरु करण्यात येईल, असे सूत्रांनी नमूद केले.

नव्या कात्रज बोगद्यापासून नवले पुलापर्यंत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष रस्ते सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये रम्बलर स्ट्रीप्स, वाहनांचा वेग दाखविणारे डिजिटल फलक, व्हेईकल स्पीड डिटेक्शन कॅमेरे आणि पीटीझेड कॅमेरे बसविण्याची कामे पूर्ण झाली आहेत. या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले असून, भविष्यात आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुभाष घंटे, वरिष्ठ अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

पुणे ते सातारा जोडणी

उड्डाणपूल – वेळे (सातारा)
समतल विलगक – वेळे (सातारा)
नदीवरील पूल – आसले (सातारा), वाकड (पुणे)
बोगदा – खंबाटकी घाटात दोन बोगद्यातून प्रत्येकी सव्वा किलोमीटरचा सहापदरी रस्ता
रुंदीकरण – किकवी येथे दोन पदरी रस्त्याचे तीन पदरीकरण
भुयारी मार्ग – हरिश्चंद्री, शिवरे, खेड शिवापूर, किवळे