New Khambatki Ghat 6 Lane Tunnel Project NHAI: गेल्या काही दशकांपासून पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट प्रवासासाठी अत्यंत थरारक मानला जातो. अरुंद मार्ग, धोकादायक वळणे, मोठी वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे खंबाटकी घाटातील प्रवास जिकारीचा होता. आता मात्र नव्या सहा पदरी बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, पुणे-सातारा प्रवास १५ मिनिटांनी वेगवान होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
‘एनएचएआय’कडून (NHAI) ‘नवीन खंबाटकी घाट ट्विन ट्युब ६-लेन टनेल’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. या खंबाटकी घाटातील नवीन सहा पदरी बोगद्याचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२६ पर्यंत बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सध्या हा बोगदा चाचणीसाठी खुला करण्यात आल्याचे ‘एनएचएआय’कडून स्पष्ट करण्यात आले.नव्या बोगद्यात अधिक चांगले रिफ्लेक्टर्स, चांगली प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, दृश्यमान सुरक्षा रॅलिंग आणि योग्य अंतरावर अग्निशामक यंत्रणा आहेत. जुन्या बोगद्याच्या तुलनेत, हा बोगदा अधिक रुंद असल्याचेही ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
सातारा ते पुणे असा प्रवास करणारा नियमित प्रवासी सांगतात,‘पूर्वी जुना बोगदा फक्त दोन पदरी होता. त्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. एखादी कार किंवा ट्रक नादुरुस्त झाला, तर मोठी कोंडी व्हायची. अपघाताचा मोठा धोका असायचा. जुना बोगदा पार करायला १५ ते २० मिनिटे लागायची. आता नवीन बोगदा फक्त ५ ते १० मिनिटात पार करता येते.’
हा बोगदा का महत्त्वाचा ?
खंबाटकी घाट हा मुंबई-पुणे-बेंगळुरू कॉरिडॉरमधील महत्त्वाचा दुवा आहे. हा बोगदा सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या मोठ्या शहरांना जोडतो. तसेच पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, इत्यादी पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या हजारो पर्यटक आणि सज्जनगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी खंबाटकी घाट महत्त्वाचा मार्ग आहे. आता नव्या बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास अधिक सुरक्षित होणार असून, प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
खंबाटकी घाटातील आधीच्या मर्यादा –
- एका दिशेने ०.८५ किलोमीटर लांबीचा दोन पदरी बोगदा.
- विरुद्ध दिशेला ८ किलोमीटर घाटाचा रस्ता.
- तीव्र वळणे, कठीण भूप्रदेश आणि वारंवार होणारी कोंडी.
- मोठ्या अपघाताचा धोका.
- इंधन आणि वेळेचा अपव्यय.
नवीन बोगद्यामुळे होणारे फायदे –
नवीन सहा पदरी ट्विन टनेल (प्रत्येक ट्यूबमध्ये तीन लेन) बोगद्यामुळे पुणे ते सातारा दरम्यानच्या प्रवासात अनेक फायदे होणार आहेत.
- प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी कमी.
- अपघाताचा धोका कमी.
- इंधन वापर आणि वाहन देखभाल खर्च कमी.
- वाहनांची झीज कमी होईल.
- स्थानिक प्रवासी, व्यापार आणि पर्यटनासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी.
