पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एकूण नऊ टप्प्यांत सुरू असलेले हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबरअखेर या दोन्ही मार्गांचे काम पूर्ण होणार असून, या मार्गामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. याचबरोबर या मार्गामुळे या जिल्ह्यांतील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम हडपसर ते वाखरी असे एकूण २३४ किलोमीटरचे असून, त्यातील २२५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गामध्ये हडपसर ते दिवेघाट १३.३५ किलोमीटर, दिवेघाट ते लोणंद ५४.५ किलोमीटर, लोणंद ते धर्मपुरी ४९.४ किलोमीटर, धर्मपुरी ते खुडुस ३९.२ किलोमीटर, खुडुस ते वाखरी ३३.१ किलोमीटर आणि वाखरी ते मोहोळ ४४.७ किलोमीटर असे सहा टप्पे आहेत. त्यातील दिवेघाट ते लोणंद, धर्मपुरी ते खुडुस, खुडुस ते वाखरी आणि वाखरी ते मोहोळ या चार टप्यांचे काम पूर्ण झाले आहे. हडपसर ते दिवेघाट या टप्प्यातील सुमारे ६ किलोमीटर आणि लोणंद ते धर्मपुरी टप्प्यातील सुमारे १ किलोमीटर काम राहिले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम एकूण १३० किलोमीटर असून, त्यातील १२३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पाटस ते बारामती ४१.३ किलोमीटर, बारामती ते इंदापूर ४२.१ किलोमीटर आणि इंदापूर ते तोंडले ४६.७ किलोमीटर अशा तीन टप्प्यांत सुरू आहे. यातील पाटस ते बारामती टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. बारामती ते इंदापूर टप्प्यातील सुमारे ६ किलोमीटर आणि इंदापूर ते तोंडले टप्प्यातील सुमारे १ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. या दोन्ही मार्गांचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

कृषी व औद्योगिक क्षेत्राला गती

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. याचबरोबर या मार्गावरील भागातील वाहतूक जोडणी वाढून कृषी व औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अभिजित औटे यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग

  • मार्गाचे काम – हडपसर ते वाखरी
  • एकूण लांबी – २३४ किलोमीटर
  • काम पूर्ण – २२५ किलोमीटर
  • खर्च – ३ हजार १५४ कोटी रुपये

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग

  • मार्गाचे काम – पाटस ते तोंडले
  • एकूण लांबी – १३० किलोमीटर
  • काम पूर्ण – १२३ किलोमीटर
  • खर्च – १ हजार ८२४ कोटी रुपये