पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागांपैकी एकूण १११ जागांसाठी नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदभरतीमध्ये उमेदवारांना ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. विद्यापीठाने या पूर्वी डिसेंबर २०२३, सप्टेंबर २०२४ अशी दोनवेळा जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी ती भरती प्रक्रिया रखडली होती. राज्यभरातील हजारो पात्रताधारक उमेदवारांनी या जागांसाठी अर्ज केला होता. भरती प्रक्रिया होत नसल्याने पात्रताधारक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यापीठांतील रिक्त जागांमुळे अध्ययन अध्यापनासह प्रशासकीय, संशोधनाच्या कामकाजावरही परिणाम होतो, तसेच या रिक्त जागांमुळे विद्यापीठाचे क्रमवारीतील स्थान, विद्यार्थिसंख्येवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व रिक्त जागांवर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पात्रताधारक संघटनांनी आंदोलनेही केली.

एनआयआरएफ क्रमवारीत राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या घसरणीनंतर अलीकडेच ऑक्टोबरमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून प्राध्यापक भरतीबाबत काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यात उमेदवारांची पात्रता आणि मुलाखत यासाठी अनुक्रमे २५ आणि ७५ असा गुणभार निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या शासन निर्णयातील काही तरतुदींमुळे भरती प्रक्रियेला अडचणी येणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर,,आता नव्याने प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यापीठाकडून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या ६ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरुन ऑनलाइन पध्दतीने अर्जांसाठी ८ नोव्हेंबर ते ७ डिसेॆबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत, संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच २०२३, २०२४मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल, सुधारणा करु शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पदनिहाय जागा

  • सहायक प्राध्यापक – ४७
  • सहयोगी प्राध्यापक – ३२
  • प्राध्यापक – ३२
  • एकूण – १११