पुणे : यंदाच्या मे महिन्यात पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा सुमारे एक हजार टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यातील सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. आता १४ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यंदा एप्रिल महिना तीव्र उष्म्याचा गेल्यानंतर मे महिन्यात हवामान झपाट्याने बदलले. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली. तसेच, १५ मेनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी तर अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा सुमारे एक हजार टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला. त्यातच २६ मे रोजी मोसमी वारे पुण्यात दाखल झाले.

१९६२नंतर पहिल्यांदाच मोसमी वारे २९मे पूर्वी पुण्यात दाखल झाले. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा दहा ते पंधरा दिवस मोसमी वाऱ्यांनी पुण्यापर्यंत मजल मारली. मे अखेरीस पावसाची तीव्रता कमी झाली. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते ७ जून या कालावधीत सरासरी ३३.८ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात २०.७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘सर्वसाधारण स्थितीमध्ये ९-१० जूनच्या सुमारास मोसमी वारे पुण्यात दाखल होतात. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात फारसा पाऊस होत नाही. मात्र, मोसमी पाऊस सक्रिय झाल्यावर सरासरी भरून निघते. यंदा मोसमी वारे लवकर दाखल झाले. तसेच मे महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. मोसमी वारे दाखल झाल्यानंतर त्यांची पुढील वाटचाल मंदावली आहे. आता १४ जूननंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनची सरासरी भरून येऊ शकते.’