पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिवाळी सुटीच्या वेळापत्रकात बदल करून ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या बदलामुळे शाळास्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही शाळांनी आयत्या वेळी परीक्षांच्या नियोजनात बदल केला, तर काही शाळांनी परीक्षा नियोजनानुसारच घेऊन ४ नोव्हेंबरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी विविध सुट्या, शैक्षणिक कामकाजाबाबतचे वार्षिक वेळापत्रक १८ मे रोजीच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. त्यात २ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुटी राहणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर शाळांनी विद्यार्थी, पालकांना दिलेल्या सूचनांनुसार २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुटी सुरू होणार असल्याचे, त्या अनुषंगाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या सत्राची परीक्षा आयोजित करण्याची माहिती दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिवाळी सुटीच्या वेळापत्रकात बदल करून आता ५ नोव्हेंबरपासून सुटी सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या बदलामुळे शाळास्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

माध्यमिक शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकानंतर काही शाळांनी त्यांच्या परीक्षांच्या नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे ३-४ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर काही शाळांकडून परीक्षा आधीच्या नियोजनानुसारच पूर्ण करून ४ नोव्हेंबरपर्यंत शाळेचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमुळे पालकांनी गावाला जाण्यासाठी महिना-दोन महिने आधी आरक्षण केले असते. अचानक सुटीच्या कालावधीत दोन-तीन दिवसांचा बदल झाल्यास पालकांना नियोजनात बदल करता येत नाही. त्यामुळे शाळा स्तरावरील नियोजन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, शाळा ४ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यात तोंडी परीक्षा, दिवाळीच्या अनुषंगाने कंदील तयार करण्यासारखे उपक्रम घेतले जाणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

दिवाळी सुटीच्या वेळापत्रकाबाबत अंशत: बदल करण्यात आला आहे. शाळांनी परीक्षांचे आयोजन त्यांच्या नियोजनानुसार करावे. – भाऊसाहेब कारेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद