पुणे : शाळकरी मुलीला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या व्हॅनचालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. व्हॅनचालकाला कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात व्हॅनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेश पाटवळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्हॅनचालकाचे नाव आहे.

पीडित मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. पाटवळेने मुलीला ‘मला तू आवडते’, असा संदेश पाठविला. मुलीच्या पालकांना ही बाब समजली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर पाटवळेला चोप देऊन डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी गणेश भोकरे, विनायक कोतकर, ऋषीकेश शिंदे, नरेंद्र तांबोळी, निलेश हांडे, सुनील लोयरे यांनी पाटवळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यची मागणी पोलिसांकडे केली.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये आठ महिन्यांत ७८ अल्पवयीन मुलींवर बलात्कार; ६६ विनयभंग!

हेही वाचा – दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?

पाटवळेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण, प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी बंद पुकारला आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीला दारू पाजून तिच्यावर तिच्या मित्रांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती.