पुणे : शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात आणि वितरणास बंदी घालण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच दिले. मात्र, शहरातील अनेक शाळांच्या परिसरात पाहिले असता, या आदेशाच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण आणि कशी करणार या बाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि अयोग्य आहाराच्या सवयींना आळा घालण्यासाठी शाळेच्या आवारात किंवा शाळेपासून ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, जाहिरात किंवा वितरण करता येणार नसल्याचा आदेश दिला. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला. या आदेशाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचे मुख्याध्यापक संघटनेने सांगितले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात प्रख्यात शाळा आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो विद्यार्थ्यांची आणि पालकांची येथे वर्दळ असते. प्रचंड वाहतुकीचा ताण असलेल्या शाळांच्या या परिसरात जंकफूडच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या अक्षरशः रांगा आहेत. अशा स्थितीत शाळेपासून ५० मीटर अंतरात जंक फूड विक्रीबंदीचा नियम केवळ कागदावरच राहण्याची भीती आहे, अशी स्थिती येथील स्थानिकांनी बोलून दाखविली.
केवळ जंक फूडच नव्हे, तर दाटीवाटीच्या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्यही आहे. कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, दुर्गंधी आणि माश्यांचा उपद्रव अशा वातावरणात विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ विकले जात आहेत. आरोग्याला अपायकारक जंक फूडचा धोका तर आहेच; त्यात अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढत असल्याची चिंता काही पालकांनी व्यक्त केली.
जंक फूडमध्ये नेमके कुठले खाद्यपदार्थ येतात?
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या खाद्यपदार्थांमध्ये चरबी, साखर, मीठ आणि कृत्रिम घटकांचे प्रमाण जास्त असते, तर पोषणमूल्ये अत्यल्प असतात, अशा पदार्थांना जंक फूड म्हटले जाते. बर्गर, पिझ्झा, चिप्स, बिस्किटे, शीतपेये, चॉकलेट, कँडी तसेच वारंवार वापरलेल्या तेलात तळलेले पदार्थ यांचा त्यामध्ये समावेश होतो. अशा पदार्थांच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वाढतो.
तज्ञ काय म्हणतात?
या आदेशाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पालक, मुख्याध्यापक आणि आमचे अधिकारी यांची बैठक बोणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळेचे मुख्याध्यापक जंक फूड विक्रेत्यांना समज देतील. समज दिल्यानंतरही विक्रेते जंक फूडची विक्री करीत असतील, तर पालकसभेत हे मुद्दा उठवला जाईल. त्यानंतर पालकांना अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले जाईल. त्यानुसार आमचे अधिकारी जंक फूड विक्रेत्यांवर थेट कारवाई करतील. वास्तविक विक्रेत्यांनाही थोडा अवधी मिळण्याची गरज आहे. त्यांनाही आम्ही थोडा वेळ देत आहोत असे मत अन्न व औषध प्रप्रशसन पुणे विभागाचे सह आयुक्त वि. दा. भोगावडे यांनी व्यक्त केले.
जंक फूडचा विरोध पालकांनी स्वत:च्या घरापासून करायला हवा. असे नमूद करत महापेरेंटस पालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप विश्वकर्मा म्हणाले की, ज्या वेळी मुलांना भूक लागते, डब्यातले अन्न खात नाहीत, तेव्हा ती जंक फूडलाच प्राधान्य देतात. त्यासाठी पालकांनीच जबाबदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनस्तरावर अंमलबजावणी कधी होईल, हे सांगता येणार नाही. मात्र, याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरातून केल्यास जंक फूडला आळा बसेल.
पुणे शहरात दीड हजारांपेक्षा अधिक शाळा आहेत. अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराजवळच जंक फूडची सर्रास विक्री होते. पण हे विक्रेते शाळा प्रशासनाचे ऐकत नाहीत. राज्य शासन असे निर्णय जारी करते. शाळा परिसरातील पोलीस यंत्रणांनी यांना नोटिसा बजावल्या तर हे चित्र बदलण्यास सुरुवात होईल. अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी नोंदवली.
अन्न व औषध प्रशासनाने शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडवर बंदी घातल्याचे आदेश पुणे महापालिकेपर्यंतही आले आहेत. महापालिकेच्या हद्दीतल्या शाळांभोवतीच्या परिसरात याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. असे आश्वासन पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त
वसुंधरा बारवे यांनी दिले.
