पुणे : मूळचे पुण्याचे आणि सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट लॉस एंजेलिस (यूसीएलए) येथे कार्यरत असलेले युवा शास्त्रज्ञ डॉ. सौमित्र आठवले यांचा जागतिक पातळीवर सन्मान झाला आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या केमिकल अँड इंजिनीअरिंग न्यूजने (सी अँड इएन) जाहीर केलेल्या प्रतिष्ठित ‘टॅलेंटेड १२’ या यादीत डॉ. आठवले यांना स्थान देण्यात आले असून, या यादीत निवड झालेल्या १२ युवा शास्त्रज्ञांपैकी डॉ. आठवले हे एकमेव भारतीय आहेत.
रसायनशास्त्र आणि संबंधित विज्ञान शाखांमध्ये उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या, जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय सुचविणाऱ्या १२ युवा वैज्ञानिकांची ‘टॅलेंटेड १२’ ही यादी दर वर्षी जाहीर केली जाते. यंदा त्यासाठी जगभरातून सुमारे ५४० नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून केवळ १२ वैज्ञानिकांची निवड करण्यात आली. त्यात डॉ. सौमित्र आठवले यांना स्थान मिळाले आहे. निवड झालेल्या शास्त्रज्ञांचे संशोधन, त्यांची माहिती शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या केमिकल अँड इंजिनीअरिंग न्यूजच्या विशेष अंकात प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे युवा संशोधकांसाठी ही यादी विशेष महत्त्वाची ठरते.
डॉ. सौमित्र आठवले हे सेंद्रिय रसायनशास्त्र आणि जैवउत्प्रेरक या क्षेत्रातील संशोधक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संशोधन गटाने लोहयुक्त एन्झाइम्स विकसित करून रसायनशास्त्रातील नवीन, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक अभिक्रिया घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे औषधनिर्मिती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या महागड्या धातूंना तसेच प्रदूषणकारी रासायनिक प्रक्रियांना पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिक शाश्वत, सुरक्षित आणि किफायतशीर औषधनिर्मिती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. केमिकल अँड इंजिनिअरिंग न्यूजने डॉ. आठवले यांच्या संशोधनाचे वर्णन ‘पुढील पिढीतील आयर्न बायोकॅटलिस्ट विकसित करणारे वैज्ञानिक’ असे केले आहे.
विज्ञानातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा हीच माझ्या संशोधनामागील खरी प्रेरणा आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त ठरतील अशा संकल्पना आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे, अशी भावना डॉ. सौमित्र आठवले यांनी व्यक्त केली.
डॉ. सौमित्र आठवले यांचा प्रवास
डॉ. आठवले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव इंग्लिश मीडियम शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेतून (आयसर पुणे) रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (एमएस) मिळवली. त्यानंतर प्रा. स्कॉट डेन्मार्क यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ एलिनॉइस अँड अर्बाना शॅम्पेनमधून (यूसीआयसी) पीएच.डी. प्राप्त केली. तसेच, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. फ्रान्सिस अर्नोल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली.
