पुण्याच्या एनसीसीएस संस्थेच्या वैज्ञानिकांचे संशोधन; फोनवरील नमुन्यांमध्ये ५१५ प्रकारचे जीवाणू व २८ प्रकारच्या बुरशींचा समावेश 

मोबाइल फोन हँडसेटवर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या तीन नवीन प्रजाती वैज्ञानिकांनी शोधून काढल्या आहेत. आपल्या मोबाईल फोनवर अनेक सूक्ष्म जीव वाढत असतात व त्यामुळे काही रोगांचा धोकाही असतो, त्यामुळे  रूग्णालयात मोबाईल फोन वापरणे हितकारक नसते. पाश्चिमात्य देशातील संशोधनानुसार मोबाईल फोन हे टॉयलेटपेक्षाही जास्त घाणेरडे असतात कारण  त्यांच्यावर घातक सूक्ष्मजीवांची वाढ होत असते.

स्मार्ट फोनमुळे प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंची वाढ होत असते. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांनी मोबाईल फोनवर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या तीन नवीन प्रजाती शोधल्या असून त्यात दोन जीवाणू व एक बुरशी आहे. त्यांचा उल्लेख कुठल्याही वैज्ञानिक संशोधनात अजून आलेला नाही. जैवतंत्रज्ञान खात्याचे अनुदान असलेल्या प्रयोगशाळेत हे संशोधन झाले आहे. २०१५ मध्ये सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्रतिरक्षा विभातील सहायक प्राध्यापक विल्यम डेपावलो यांनी असे म्हटले होते की, टॉयलेटमध्ये तीन प्रकारचे जीवाणू असतात, पण मोबाईल फोनवर १० ते १२ प्रकारचे जीवाणू व बुरशी असतात. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतात पण त्यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो. मोबाईलला लागलेला घाम व धूळ यामुळे त्यावर जीवाणू व बुरशीची वाढ होत असते. पुण्यातील राष्ट्रीय पेशी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश शौचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७ मोबाईल फोन पडद्यांवरील नमुने गोळा केले व त्यात ५१५ प्रकारचे जीवाणू व २८ प्रकारच्या बुरशी यांचे वर्गीकरण केले. यातील काही जीवाणू मानवस्नेही असतात, ते आपल्या शरीरावर आढळतात, असे सहसंशोधक प्रवीण राही यांनी सांगितले. या संशोधकांनी नंतर कापसाचे बोळे जंतुरहित करून जंतुनाशक सलाईनने सूक्ष्म जीवाणू नष्ट केले व नंतर ३० अंश तापमानाला त्यांची वाढ करण्यात आली. त्यात दोन नवीन प्रकारचे जीवाणू व एक नवीन बुरशी सापडली. दोन नवीन जीवाणूंची नावे लायसिबॅसिलस टेलेफोनिकस व मायक्रोबॅक्टिरियम टेलेफोनिकम अशी आहेत. बुरशीच्या नवीन प्रजातीचे नाव पायरेनोशाएटा टेलेफोनी असे आहे. जे नमुने गोळा करण्यात आले त्यात एकही सूक्ष्मजीवाणू बहुऔषध प्रतिरोधी स्टॅफिलोकॉकस ऑरियस सूक्ष्मजीवाणूइतका घातक नाही. अर्थात यात आरोग्य कर्मचारी वापरतात त्या स्मार्टफोनची तपासणी नमुने घेताना केलेली नाही कारण तेथे महाजीवाणू स्मार्टफोनवर असू शकतात. पुण्यातील या संशोधनाचा अन्वयार्थ असा, की भारतात मोबाईल फोनमुळे घातक सूक्ष्म जीवाणू पसरण्याचा धोका तुलनेने कमी आहे.

भारतात १.३ अब्ज इतकी लोकसंख्या असून टॉयलेटपेक्षा मोबाईलची संख्या जास्त आहे. २०१५ मध्ये इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे एका अभ्यासात डॉक्टरांच्या फोनवरील चाळीस नमुने घेतले असता त्यात महाजीवाणू आढळून आले होते. याच आठवडय़ात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, १२ प्रकारच्या जीवाणूंनी प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्सला नामोहरम  केले आहे. त्यामुळे महाजीवाणूंना मारण्यासाठी नवीन रसायने शोधण्याची गरज आहे. मोबाईल फोन टॉयलेटमध्ये घेऊन न जाणे व नेहमी ते साबणाच्या पाण्याने अध्र्या ओल्या कापडाने पुसणे हा धोके टाळण्याचा उपाय आहे. मोबाईल वापरताना तो पूर्ण कोरडा करणे आवश्यक असते. व्यावसायिक स्वच्छता द्रावणे किंवा सॅनिटायजर वापरू नये असा सल्ला दिला जातो. ते वापरावेसे वाटले तरी त्याआधी मोबाईल फोन स्वीच ऑफ करणे आवश्यक असते. भारतात सध्या मोबाईल हँडसेटची संख्या ९० कोटी आहे, त्यामुळे त्यातून सूक्ष्मजीवाणूंचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे.

नव्या जीवाणू व बुरशीचा शोध

मोबाईलला लागलेला घाम व धूळ यामुळे त्यावर जीवाणू व बुरशीची वाढ होत असते. पुण्यातील राष्ट्रीय पेशी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश शौचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७ मोबाईल फोन पडद्यांवरील नमुने गोळा केले व त्यात ५१५ प्रकारचे जीवाणू व २८ प्रकारच्या बुरशी यांचे वर्गीकरण केले.  त्यात दोन नवीन प्रकारचे जीवाणू व एक नवीन बुरशी सापडली. दोन नवीन जीवाणूंची नावे लायसिबॅसिलस टेलेफोनिकस व मायक्रोबॅक्टिरियम टेलेफोनिकम अशी आहेत. बुरशीच्या नवीन प्रजातीचे नाव पायरेनोशाएटा टेलेफोनी असे आहे.