पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आला असून हा मेसेज करणार्या आरोपीला अटक करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे.पण हा आरोपी ससून रुग्णालयातील सुरक्षारक्षक निघाला आहे.अरविंद कृष्णा कोकणी (वय 29, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील डॉक्टरच्या मोबाईलवर 12 मे रोजी एका व्यक्तीकडून रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा मेसेज आला.त्या मेसेजबाबत आम्हाला रुग्णालयामधून माहिती देण्यात आली. त्यानंतर बीडीडीएस पथकामार्फत तात्काळ रुग्णालय परिसराची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये काहीही आढळून आले नाही.तो मेसेज कोठून आला आहे.याबाबत तपास सुरू होता.तो मेसेज रुग्णालय परिसरामधूनच आल्याचे स्पष्ट झाले.
पण तो मोबाईल मेसेज केल्यानंतर बंद असल्याचे समोर आले.पण आमचा तपास सुरूच होता.त्यानंतर 14 मे रोजी आरोपी सुरक्षारक्षक अरविंद कृष्णा कोकणी याला पकडण्यात यश आले.तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर, तो मोबाईल वॉर्ड क्रमांक 73 मधील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरून डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज पाठवल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.तसेच या आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.