सर्वाधिक गुन्हे मुंबई, पुणे आणि वर्धा शहरात; २०१५ मध्ये राज्यात साडेचार हजार गुन्हे दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ नागरिकांवर होणारे हल्ले, तसेच त्यांना धमकावून लुटण्याचे प्रकार, खून अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या गुन्हेविषयक अहवालात नोंदवले आहे. सन २०१५ मध्ये राज्यात ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील चार हजार ५६१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सीआयडीच्या अहवालात देण्यात आली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सन २०१५ मध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्य़ांची आकडेवारी संकलित केली आहे. गुन्हेविषयक अहवालाचे (क्राईम इन महाराष्ट्र- २०१५) प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते हल्ले, त्यांचे खून अशा घटना घडल्यामुळे सन २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा नवीन कायदा (मेंटनन्स अँड वेल्फेअर ऑफ पेरेंट्स अँड सीनिअर सिटीजन अ‍ॅक्ट २००७) तयार करण्यात आला. त्यानुसार राज्यभरात ज्येष्ठांसंदर्भातील गुन्ह्य़ांचे विश्लेषण पोलिसांकडून करण्यात येते.

सन २०१५ मध्ये ज्येष्ठांसंदर्भातील चार हजार ५६१ गुन्हे दाखल झाले. सन २०१४ मध्ये अशा प्रकारचे तीन हजार ९८१ गुन्हे दाखल झाले होते. तुलनात्मक  पाहणी केल्यास सन २०१५ मध्ये ज्येष्ठांसंदर्भातील गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात (एक हजार १२१) दाखल झाले आहेत. त्या खालोखाल पुणे शहरात ३४० अणि वर्धा शहरात २१० गुन्हे दाखल झाले आहेत. सन २०१५ मध्ये राज्यात १६७ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले. त्यामध्ये सर्वाधिक खून पुणे जिल्ह्य़ात झाले आहेत. सन २०१५ मध्ये पुणे जिल्ह्य़ात १३ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले. अमरावतीत नऊ खून झाले तसेच नांदेड, सांगली आणि गडचिरोली येथे प्रत्येकी आठ खून झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील ४४२ न्यायालयीन खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी ११५ जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सन २०११ मध्ये एकूण लोकसंख्येपैकी ८.३ टक्के इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती. लोकसंख्येचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे, असे निरीक्षण गुन्हेविषयक अहवालात नोंदवले आहे.

ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या; हेल्पलाइनची मदत घेण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहेत. पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षाअंतर्गत खास हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या तक्रारी १०९० या क्रमांकावर कराव्यात, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या आधिक आहे. अनेकांची मुले नोकरीनिमित्त परदेशात तसेच देशातील अन्य शहरात वास्तव्यास आहेत. एकटय़ाने राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सन २००५ मध्ये पुणे पोलिसांकडून खास कक्ष कार्यान्वित करण्यात आला. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी चार म्हिन्यांपूर्वी खास हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या अंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघाबरोबर नियमित बैठका आयोजित करण्यात येतात. ज्येष्ठांना पोलिसांकडून खास ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यावर त्यांचे नाव, पत्ता, तसेच शारीरिक व्याधींची माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून एकटे राहणारे ज्येष्ठ काही कामानिमित्त बाहेर पडले तर त्याचा फायदा त्यांना व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे.

ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील साडेचार हजार ज्येष्ठांची नोंदणी करण्यात आली आहे. नजीकच्या पोलीस ठाण्यांना एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची माहिती उपलब्ध क रून देण्यात आली आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकांनी नियमितपणे ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट द्यावी तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकांची मुले परदेशात स्थायिक आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांकडे पारपत्र नाहीत. एखाद्या ज्येष्ठाने पारपत्रासाठी पोलिसांकडे पडताळणी करण्यासंदर्भात संपर्क साधला तर त्याला पोलीस ठाण्यात बोलावू नये. ज्येष्ठांच्या घरी जाऊन पारपत्रासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशाही सूचना पोलीस आयुक्त शुक्ला यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

जेष्ठ नागरिकांसाठी सूचना

  • अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नका
  • घरकामास ठेवलेल्या नोकरांची माहिती स्थानिक पोलिसांना द्या
  • बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या
  • दागिन्यांचे प्रदर्शन टाळा
  • ज्येष्ठांनी त्यांच्या तक्रारी १०९० या क्रमांकावर कराव्यात
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune senior citizen is not secured
First published on: 13-12-2016 at 02:10 IST