scorecardresearch

पुणे : स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; ‘जस्ट डायल’वरील फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी केला पर्दाफाश

मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई

sex racket pune
या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय (प्रातिनिधिक फोटो)

विमाननगर येथील एका आलिशान स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. मेरीयन ब्युटी स्पा असे या मसाज पार्लरचे नाव असून तेथून परराज्यातील तीन तरुणींची सुटका करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

स्पाचा व्यवस्थापक सुफीयान अहमद अली (वय २२, रा. विमाननगर, मूळ रा. आसाम) आणि त्याचा साथीदार अब्दुल मलिक मुफूर अली (वय २१, रा. येरवडा, मूळ रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या स्पाचा मालक-भागीदार महंमद अब्दुल हचिब (वय २५, रा. आसाम), अन्वर दाऊदभाई अहमदाबादी (वय ६८, रा. विमाननगर) आणि शबनम सुलेमान शेख (वय ३२, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

विमाननगर येथे मेरीयन स्पा रो हाऊस येथे हा मसाज पार्लर सुरु होता. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. तेथे मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी या स्पावर छापा टाकला. त्यात तेथील आसाम येथील एका तरुणीसह तिघा तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे उघड झाले. दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असून २३ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

विमाननगर परिसरातील एखाद्याने जस्ट डायल या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लरबाबत कोणत्याही प्रकारची माहितीची विचारणा केली की, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर मेरीयन मसाज पार्लरचे मेसेज येणे सुरु होत आणि त्यातून त्या व्यक्तीला ग्राहक बनवून, मसाजचे नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीखक सुप्रिया पंढरकर, हवालदार कुमावत, अश्विनी केकाण, नाईक हनुमंत कांबळे, अण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune sex racket busted at massage parlour in vimannagar pune print news scsg

ताज्या बातम्या