पुणे : कोथरूडमधील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. ॲड. संजय उडाण असे जामीन अर्ज फेटाळून लावलेल्या वकिलाचे नाव आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आल्याची घटना दोन वर्षंपूर्वी घडली होती. वैमनस्य, तसेच वर्चस्वाच्या वादातून मोहोळ याचा खून गणेश मारणे टोळीतील सराइतांनी केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी मारणे याच्यासह साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. मोहोळ याचा खून झाल्यानंतर सूत्रधार नामदेव कानगुडे याच्याशी ॲड. उडाण यांनी संपर्क साधला होता. मोहोळ याच्यावर गोळीबार करणारे आरोपी ॲड. उडाण यांना भेटले.
त्या वेळी मोहोळवर गोळीबार करणारा आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, चंद्रकांत शेळके तेथे उपस्थित होते. ॲड. उडाण यांनी त्यांना मोटारीतून पसार होण्यास सांगितले. ॲड. उडाण यांनी या प्रकरणातील सहआरोपी वकील ॲड. रवी पवार यांच्याशी संपर्क साधून आराेपींना पसार होण्यास सांगितले होते. आरोपी मोटारीतून पसार झाल्यानंतर त्यांना मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट करण्यास सांगितले होते. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ आरोपींना नवीन सीमकार्ड देण्यात आले. नवी मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपींना करुन देतो, असे सांगितले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी ॲड. उडाण, ॲड. पवार यांना अटक केली होती.
ॲड. उडाण यांनी या प्रकरणात जामीन मिळावा, असा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत, तसेच मोहोळ खून प्रकरणातील मूळ फिर्यादीचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जास विरोध केला. आरोपींना गुन्ह्याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला.
बचाव पक्षाच्या वकिलांनी सरकार पक्षाच्या युक्तिवादास विरोध केला. ‘आरोपी हे ॲड. उडाण हे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क हा व्यावसायिक कारणावरुन झाला होता. या प्रकरणातील सहआरोपी वकील ॲड. रवी पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. समानतेच्या तत्वावर ॲड. उडाण यांना जामीन मंजूर करण्यात यावा’, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात नमूद केले.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने ॲड. उडाण यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ॲड. रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती. त्यांचा थेट मारेकऱ्यांशी संबंध नव्हता. ॲड. उडाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली. त्यांना पोलिसांसमोर हजर होण्याचा सल्ला दिला. खून प्रकरणानंतर समन्वय साधला. त्यामुळे या गुन्ह्यात ॲड. उडाण यांचा सक्रीय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. असे निरीक्षण न्यायालायने नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.
