पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आरोपीने ४५ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निषन्न्न झाले असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.याबाबत गणेश अनिल घोलप (रा. धनगर आळी, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बावधन परिसरात राहायला आहे. आरोपीशी घोलप यांची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपीने ‘राजपूत वाईज इन्व्हेस्टमेंट ’नावाची कंपनी असून, संबंधित कंपनीला ‘सेबी’ची मान्यता असल्याची बतावणी केली होती. संबंधित कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. आरोपीने २०२२ ते २०२५ या कालावधीत घोलप यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले.
गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्याने पैसे घेतले होते. घोलप यांच्यासह ४५ जणांकडून त्याने १२ काेटी रुपये घेतले. सुरुवातीला आरोपीने त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. आरोपीने परतावा देणे बंद केल्यानंतर गुंतवणुदकारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक
घरातून ऑनलाइन कामाची संधी (ऑनलाइन टास्क) अशा आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची पाच लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय तरुण काेंढवा परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ऑक्टोब महिन्यात संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामचाी असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर तरुणाच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा करण्यात आल्याचा बनावट संदेश पाठविण्यात आला. प्रत्यक्षात त्याला परतावा दिला नव्हता. दरम्यान, तरुणाला या कामात आणखी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले.
सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी तरुणाने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पाेलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.
