पुणे : मुखवटे लावूनच जगणाऱ्या या जगात ‘त्या’ मात्र आपला खरा चेहरा न लपवता मोठ्या धैर्याने उभ्या आहेत. त्यांच्यावर जे गुदरले त्याच्याशी लढत आणि समाजाला आपल्या ‘नजरा’ नीट करा, असे सांगत. समाजाला त्यांच्या परिस्थितीशी लढण्यासाठी ‘हीरोज’ हवे असतात. ‘या’ मात्र समाजाशी स्वत: लढून ‘शीरोज’ म्हणून परिस्थितीला थेट भिडताहेत.
ही कहाणी आहे ॲसिड हल्ल्याला सामोरे गेलेल्या मुली, महिलांची. छाँव फाउंडेशन ही संस्था अशा पीडितांसाठी काम करते, त्यांना पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करायला मदत करते. याच संस्थेच्या सहकार्याने ॲसिड हल्ला झालेल्या काही तरुणींनी एकत्र येऊन पुण्यात ‘शीरोज’ या कॅफेचा नुकताच प्रारंभ केला.
या कॅफेमध्ये काम करणाऱ्या तरुणींच्या कथा खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. कुणावर चुलत भावाने, कुणावर बहिणीने, तर एकीवर स्वतःच्या वडिलांनी ॲसिड फेकले. कारणे वेगवेगळी असली, तरी या सर्वांच्या केवळ शरीरावर नाही, तर मनावरही कायमस्वरूपी जखमा झाल्या.
मूळची हरियाणातील एक मुलगी २०१२ पासून छाँव फाउंडेशनशी जोडली गेली. किरकोळ कारणावरून तिच्याच चुलत भावाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. या आघातातून सावरताना तिने स्वतःचेच नव्हे, तर इतर पीडितांचे आयुष्य उभे करण्याचे ध्येय स्वीकारले. ‘समाजाच्या विचित्र नजरा अजूनही त्रास देतात,’ असे सांगताना तिने पुण्यातही कटू अनुभव आल्याचे सांगितले. खरेदीसाठी बाहेर पडल्यावर लोकांनी आपल्या मुलांच्या नजरेस अशी विद्रूप व्यक्ती पडू नये म्हणून तोंड झाकल्याचे प्रसंग तिने अनुभवले. ‘आमचा खरा संघर्ष इथूनच सुरू होतो. मात्र, एक दिवस समाज आम्हाला स्वीकारेल, याची खात्री आहे,’ असा विश्वासही तिने व्यक्त केला.
उत्तराखंडमधील एकीवर तिच्या होणाऱ्या पतीने तीन वर्षांपूर्वी ॲसिड फेकले. आरोपीला शिक्षा झाली असली, तरी त्याच्या कुटुंबीयांकडून समाजमाध्यमांवर तिची बदनामी आजही सुरू आहे. उत्तर प्रदेशातील एका मुलीवर तिच्याच बहिणीने आणि मेव्हण्याने ईर्ष्यातून ॲसिड हल्ला केला. कुटुंबाच्या आधाराने तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
ओडिशातील एकीवर शालेय जीवनातच एकतर्फी प्रेमातून ॲसिड हल्ला झाला. दुभंगलेल्या कुटुंबातील संघर्षाची शिकार ठरलेल्या एका मुलीवर तिच्याच वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी ॲसिड फेकले. मात्र, आईने तिला सावरून नव्याने जगण्याची उमेद दिली. मॉडेल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मुलीने पुढे रॅम्पवरही आपली छाप पाडली.
अशी आहे ‘शीरोज’ची वाटचाल
अलोक दीक्षित यांनी दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये छाँव फाउंडेशनची स्थापना केली. ॲसिड हल्ला झालेल्या मुली, युवतींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा निकोप नसतो. त्यांना लवकर कोणी नोकऱ्याही देत नाही, असा अनुभव आल्याने त्यांनी सर्वप्रथम २०१३ मध्ये आग्रा येथे शीरोज कॅफे सुरू केला. सुरुवातीला लोकांच्या फारशा सकारात्मक प्रतिक्रिया नव्हत्या, पण हळूहळू प्रतिसाद वाढत गेल्याचे दीक्षित यांनी सांगितले. नंतर नोएडा, लखनौ, दिल्ली आणि आता पुण्यात गेल्या चार जूनपासून हा कॅफे सुरू झाला आहे. यानिमित्ताने या मुलींना आत्मविश्वास, रोजगार आणि सुरक्षित वातावरण मिळत असल्याचे दीक्षित यांनी नमूद केले.
‘घटनांचा योग्य तपास आवश्यक’
‘ॲसिड हल्ला प्रकरणात जिवे मारण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला, तर त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. बऱ्याच वेळा न्यायालयात पीडित आणि साक्षीदार यांच्याकडून आलेल्या पुराव्यांच्या आधारावर प्रकरणाचा निकाल लागत असतो. त्यामुळे योग्य तपास असेल आणि कलमे सुरुवातीलाच लावली असतील, तर जन्मठेपेची शिक्षा निश्चितपणे होऊ शकते. जामिनावर सुटल्यावर आरोपीकडून पीडितेला जर पुन्हा त्रास होत असेल आणि ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली तर आरोपीची पुन्हा तुरुंगात रवानगी होते,’ असे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांनी सांगितले.
ॲसिड हल्ल्याच्या घटना
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२३-२४ मध्ये ॲसिड हल्ल्याच्या सहा घटना घडल्या. २०२२ मध्ये आठ, तर २०२१ मध्ये सहा घटना घडल्याची नोंद आहे. ॲसिड हल्ल्याच्या सर्वाधिक तब्बल ५७ घटना २०२३-२४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झाल्याची नोंद आहे.
