पुणे : राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील, विद्यापीठांतील प्राध्यापक भरतीमध्ये शासनाचा प्रतिनिधी असतो. त्या धर्तीवरच अनुदानित शाळांतील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शिक्षक विभागाने निरीक्षक नेमणे, तसेच मुलाखतीचे चित्रीकरण उपलब्ध करून घेणे, अशी मागणी करण्यात येत असून, शिक्षण विभागाकडून उपाययोजनांबाबतची चाचपणी करण्यात येणार आहे.
राज्यात पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीविना निवड प्रकारात शिक्षक भरतीचा टप्पा राबविण्यात आला. त्यात निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. खासगी अनुदानित शाळांतील रिक्त जागांवर उमेदवार निवडीचा अधिकार संबंधित शिक्षण संस्थांना आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षण संस्थांना पात्र उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे.
शिक्षण संस्थांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे. त्यात मुलाखतीसाठी असलेल्या १० गुणांमध्ये वशिलेबाजी, गैरप्रकारांची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, मुलाखतीसह निवड या प्रकारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी, निवड पारदर्शक होण्यासाठी प्राध्यापक भरतीप्रमाणे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यात सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदावरील नियुक्ती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचे सीसीटीव्ही प्रणालीद्वारे चित्रीकरण करणे, मुलाखतीच्या दिवसापासून किमान एक वर्ष गोपनीय दस्तऐवज म्हणून चित्रीकरण जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर म्हणाले, ‘मुलाखतीसह शिक्षक भरती प्रकारात यापूर्वी एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात येत होती. आता एका जागेसाठी तीन उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील गैरप्रकार काही प्रमाणात कमी होतील. मात्र, काही ठिकाणी उमेदवारांकडे पैशांची, देणगीची मागणी केली जाते. असे प्रकार टाळून गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यास प्राधान्य असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया राबविणे, मुलाखतीचे चित्रीकरण शिक्षण विभागाने उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.’
मुलाखतीसह निवड प्रकारातील शिक्षक भरतीसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा विचार करता येईल. तसेच, मुलाखतींचे चित्रीकरण उपलब्ध करून घेणे, मुलाखतीचे थेट प्रसारण शिक्षण विभागाकडे करणेही शक्य आहे. त्या दृष्टीने व्यवस्था करण्याबाबत चाचपणी करण्यात येईल. – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
मुलाखतीसह निवड प्रकारात शिक्षक भरतीमध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीचे चित्रीकरण शिक्षण विभागाने ताब्यात घेतले पाहिजे. तसेच, भरती प्रक्रियेवर शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत काटेकोर देखरेख करणे गरजेचे आहे. – महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
