पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरात एकाचा खून करून पसार झालेल्या आरोपीसह त्याच्या साथीदारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राजगड पोलीस ठाण्यातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, मुंढवा, मूळ रा. कुरण, पानशेत, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या नाव आहे. या प्रकरणी मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, पूना हाॅस्पिटलसमोर, सदाशिव पेठ), मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबूलाल कोरी (दोघे रा. पर्वती दर्शन) यांना अटक करण्यात आली. पुणे-सातारा महामार्गावर ११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाची घटना घडली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मंथन, परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी साथीदार मिझान, संदीप यांच्या मदतीने देशमुख याचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपी मंंथन वैद्य याचे वडील दिनेश यांचा २००३ मध्ये देशमुख याने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने देशमुख याचा खून केल्याची कबुली दिली. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहायक निरीक्षक चेतन मछले, उपनिरीक्षक युवराज धोंडे, संतोष तोडकर, संतोष भापकर, विशाल भोरडे, किरण बर्काले, नीलेश राणे, नाना मदने, मयूर निंबाळकर, राजेंद्र मुंढे, कोंढाळकर, मेस्त्री, भालेराव, शिंदे, नलावडे यांनी ही कामगिरी केली.
