अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यातील शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. पीएमपी बस आणि मोटारचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून चारचाकी वाहने तसेच पीएमपी बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखानामार्गे टिळक रस्त्याकडे जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने जावे. गर्दी नसल्यास लाल महाल चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाण्यास दुचाकीस्वारांना मुभा देण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास शिवाजी रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.