पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालय, तसेच मेट्रो स्थानकात बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी पाठविण्यात आल्यानंतर घबराट उडाली. दुपारी अडीचच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश पाठविण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले. पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. बाॅम्ब शोधक नाशक पथकाने शिवाजीनगर न्यायालय, तसेच मेट्रो स्थानक परिसराची कसून तपासणी केली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू सापडली नाही.
शिवाजीनगर न्यायालयातील अधिकृत ई-मेलवर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ई-मेल पाठविण्यात आला. शिवाजीनगर न्यायालय, तसेच मेट्रो स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचारी, तसेच बाॅम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाचा परिसर मोकळा करण्यात आला. न्यायाधीश, कर्मचारी न्यायालयाच्या आवारातील अशोक हाॅल परिसरात जमले. बाॅम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली, तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयासमोरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. सोमवारी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणांची सुनावणी झाली नाही. संबंधित प्रकरणांना पुढील तारीख देण्यात आली. ‘धमकीचा ई-मेल पाठविण्यात आल्यानंतर त्वरित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली. सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळपर्यंत तपासणी सुरू होती,’ असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले. पोलिसांनी शिवाजीनगर मेट्रो स्थानक परिसराची तपासणी केली.
पुण्यासह राज्यातील अन्य न्यायालयात धमकीचा ई-मेल
पुण्यासह राज्यातील अन्य न्यायालयात धमकीचा ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली. एकाच वेळी राज्यातील विविध शहरांत धमकीचे ई-मेल पाठविण्यात आले. ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
