पुणे : शहरात अल्पवयीन मुलींवरील वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांविरोधात पुणे शहर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने कोंढवा येथील खडीमशीन चौकात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, चिमुकल्यांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजेत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, येवलेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.

शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. पक्षाच्या महिला आघाडी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. यात स्वाती टकले, सुदर्शन त्रिगुनाईत, संगीता ठोसर, अमर घुले, पंकज कोद्रे, सुभाष घुले, दत्ता खवळे, सुहास पडवळ यांचा समावेश होता.

उपस्थित महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत शहरात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नसरापूर, पर्वती आणि येवलेवाडी येथील सलग घटनांमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची टीका देखील करण्यात आली. आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

खडीमशीन चौकातून येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलना दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष यंत्रणा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच संवेदनशील भागांत वाढीव पोलिस गस्त, शाळा परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था आणि लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये झिरो टॉलरन्स धोरण राबविण्याची मागणी देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले, चिमुकल्या मुलींवरील अत्याचार ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटना वाढत असून समाजाच्या नैतिक अध:पतनाची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. घरात, नात्यात आणि परिसरात मुली सुरक्षित नसतील, तर ही चिंतेची बाब आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील दोषींवर कोणतीही दया,माया न दाखविता कठोर कारवाई करावी.पोलीसांकडे कायदा आणि सुव्यवस्थेती जबाबदारी आहे. त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

खडीमशीन चौकातून येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलना दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच संवेदनशील भागांत वाढीव पोलिस गस्त, शाळा परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी करण्यात आली.