शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”

रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

नक्की वाचा >> “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख…”; पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली भावनिक श्रद्धांजली

आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला . त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव सांगितला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune shivshahir babasaheb purandare passes away at age of 100 svk 88 scsg
First published on: 15-11-2021 at 07:15 IST