पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातील ७५ संस्थांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा रविवारी (२२ जून) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ‘विवेकाची पेरणी आणि राजकारणाचा पंचनामा’ व सुनीताराजे पवार संपादित ‘विवेकवादी डॉ. श्रीपाल सबनीस : विचार आणि वारसा’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, खासदार ओमराजे निंबाळकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव आणि आमदार कैलास पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.