पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोकड असा २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हे सिंहगड रस्त्यावरील मधुबन सोसायटीत राहायला आहेत. १२ जून रोजी महिला आणि कुटुंबीय तुळजापूर आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. शनिवारी (१४ जून) सकाळी सव्वासातच्या सुमारास महिला आणि कुटुंबीय देवदर्शनाहून परतले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोने-चांदीचे दागिने, रोकड असा २४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

खराडी, हडपसरमध्ये सदनिकेतून लॅपटाॅप चोरी

खराडी आणि हडपसरमधील काळेपडळ भागात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी लॅपटाॅप, रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुण खराडीतील थिटे वस्ती परिसरात राहायला आहे. १४ जून रोजी सदनिकेचा दररवाजा उघडा असल्याची संधी साघून चोरट्यांनी तीन हजारांची रोकड, लॅपटाॅप, मोबाइल संच, पाकिट असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस कर्मचारी खरपुडे तपास करत आहेत. हडपसरमधील ससाणेनगर परिसरात सदनिकेतून दोन लॅपटाॅप, पाकिट असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार आणि त्याचा मित्र ससाणेनगर परिसरात भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. १४ जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सदनिकेचा दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी संधी साधली. सदनिकेतून तक्रारदार तरुण आणि त्याचा मित्राचा लॅपटाॅप, तसेच पाकिट असा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.

रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने चोरी

रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सोमवार पेठेत राहायला आहेत. त्या १४ जून रोजी रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकातून मार्केट यार्डकडे रिक्षातून निघाल्या हाेत्या. रिक्षात अन्य प्रवासी होते. प्रवासादरम्यान महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. पोलीस कर्मचारी शेख तपास करत आहेत.