पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. त्यांना व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे जमा करता येणार असल्यामुळे नोटीसा मिळालेल्या मतदारांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, एसआयआरअंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

डुडी म्हणाले, ‘ मतदार यादीतील नोंदीमध्ये तार्किक विसंगती आढळून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीसाठी तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी (ईआरओ) किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एईआरओ) कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. बीएलओ घरी भेट देऊन कागदपत्रे स्वीकारतील. उपलब्ध सुविधेनुसार व्हॉट्सॲप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे जमा करता येतील. संबंधित विसंगतीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रे, बीएलओचा अहवाल किंवा पंचनामा याआधारे प्रकरणाची कार्यवाही करण्यात येईल. कागदपत्रे अपूर्ण असल्यास आवश्यकतेनुसार अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’

दरम्यान, वाढीव कालावधीत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये संबंधित बीएलओ उपस्थित राहतील. प्रारूप मतदार यादीत नावाची पडताळणी, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना ८ तसेच नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन सुविधा

प्रारूप मतदार यादीतील नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरणे तसेच मतदार यादीतील माहितीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८ ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाइन’ ॲप वापर करता येईल. एसआयआर कार्यक्रम, नोटीस, मतदार नोंदणी तसेच विशेष शिबिरांबाबत अधिक माहितीसाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महाविद्यालयांमध्ये नोंदणी

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमधील पात्र नागरिकांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती आणि विशेष नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.