पुणे : शहरातील टेकड्यांच्या उतारावर झोपडपट्ट्यांमध्ये वसलेली ४३ टक्के कुटुंबे इंधनासाठी सरपण वापरत असल्याचे समोर आले आहे. सरपण गोळा करण्याच्या कामामुळे महिलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षण सम्यक पुणे आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.

सम्यक पुणे आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने शहरातील टेकड्यांवर सरपणासाठी लाकूड तोडल्यामुळे होणारी पर्यावरणी हानी आणि मानवी आरोग्यावरील परिणाम या विषयावर संशोधनपर अभ्यास करण्यात आला. दि. ९ ते १४ मार्च दरम्यान हा अभ्यास करण्यात आला. यात क्षेत्रभेट आणि ४३४ महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्याची माहिती सम्यक पुणेचे संचालक आणि अभ्यासाचे मुख्य संशोधक आनंद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभ्यासात पवार यांच्यासह प्रीतम पोतदार, रिया जाधव यांनी संशोधन केले. तसेच शिवानी शिंदे, संस्कृती सूर्यवंशी, संस्कृती हाके, साहिल पठाण, पृथ्वीराज करडे, अभिषेक खराते, प्रज्वल हरपळे, कीर्ती खाडे, स्वप्निल भस्मे, साक्षी विपट, साक्षी मोहिते या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. शालिनी गुलदेवकर आणि डॉ. आशालता विद्यासागर यांनी मार्गदर्शन केले.

पवार म्हणाले, ‘एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून पुण्याची ओळख केली जात असताना, शहरातील टेकड्यांच्या उतारावर राहणाऱ्या कुटुंबांना इंधनासाठी सरपणावर अवलंबून राहावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. यातील ५७ टक्के कुटुंबांकडून स्वयंपाकासारख्या कामांसाठी एलपीजीचा वापर केला जातो. तर, ४३ टक्के कुटुंबांना आजही सरपण आणावे लागते. या टेकड्या शहराची फुफ्फुसे मानली जातात. मात्र, दररोज सरपणासाठी लाकूड तोडत असल्यामुळे पर्यावरणीय हानी आणि मानवी आरोग्याच्या समस्या अशा दोन्ही पातळ्यांवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.’

Award Banner

‘अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी सरपणाचा वापर केला जातो. यासाठी महिलांना दर आठवड्याला टेकड्यांवर जाऊन सरपण गोळा करावे लागते. हे काम वेळखाऊ असते. तसेच सरपणाचे जड ओझे घेऊन टेकडीवर लांबचे अंतर चालावे लागत असल्याने पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि घसरून पडल्याने होणारी दुखापत याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ही स्थिती अधिक गंभीर होते. हा प्रश्न केवळ इंधनापुरता मर्यादित नाही. वस्त्यांमध्ये असलेला पायाभूत सुविधांचा अभाव या समस्येचे मूळ आहे,’ असे निरीक्षणही पवार यांनी नोंदवले.

पर्याय काय?

शहरातील टेकड्यांवर व्यक्तिगत सौर पॅनल उपलब्ध करून देण्याची तरतूद महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये करावी. तसेच गरीब वीज ग्राहकांसाठी असलेल्या ‘स्मार्ट’ योजनेंतर्गत परिसरातील रहिवाशांना सौर वीज मिळावी म्हणून महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी पवार यांनी केली. दरम्यान, शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या महावितरणच्या दारिद्र्यरेषेखालील वीजग्राहकांना ‘स्मार्ट’ योजनेंतर्गत अत्यंत कमी खर्चात छतावर सौर प्रकल्प बसवून देण्यात येतात. त्यासाठी राज्य शासनाकडून ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.

ठळक निरीक्षणे

  • ५७ टक्के कुटुंबांकडून एलपीजीचा वापर
  • ४३ टक्के कुटुंबे एलपीजीबरोबर सरपणावर अवलंबून
  • धुरामुळे महिलांना श्वसनाच्या समस्यांबरोबरच खोकला, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखीचा त्रास
  • मासिक पाळी आणि गरोदर महिलांना सरपण आणावे लागत असल्याने अनेक महिलांच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर गंभीर परिणाम