पुणे : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५० हजार लघुउद्योग आर्थिक अडचणीत सापडल्याचे निरीक्षण उद्योजकांच्या संघटनांकडून नोंदविण्यात आले. गॅस तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लघुउद्योग बंद करावे लागत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यात मार्चअखेरमुळे रखडलेल्या कामांवर दंड भरावा लागण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, इंजिनीअरिंग लघुउद्योगांना गॅस आणि ऑईलची मोठ्या प्रमाणात गरज असते. सध्या निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे वेल्डिंगसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. तर, गॅसअभावी मेस, कॅन्टीन बंद होत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या कामगारांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ते गावाकडे स्थलांतर करीत आहेत. गॅस महाग झाल्याने अनेक लघुउद्योजकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचे ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’कडून कळवण्यात आली.
‘मोठ्या व्यवसायांना, देशाअंतर्गत आणि विदेशी कंपन्यांना लघुउद्योगांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादनांचा पुरवठा केला जातो. अनेक कामे मार्चअखेर पूर्ण करायची असतात. तसेच, महापालिकेचा कर, वर्षाची वीज देयके याच महिनाअखेर भरायची असतात. मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा, गॅस आणि इंधनाचा प्रश्न निर्माण झाल्याने कामे रखडली आहेत. कामगार वर्गात भीतीचे वातावरण आहे,’ असे असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. या परिस्थितीचा जिल्ह्यातील ५० हजार उद्योगांना थेट फटका बसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘फोर्जिंग उद्योगात धातू तापवण्यासाठी गॅस आणि फर्नेस ऑईल हे दोन प्रमुख इंधन स्रोत गरजेचे असतात. गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात आता गॅसपुरवठा खंडित होण्याचीही भीती आहे. आता अधिक खर्चात उद्योग चालवत आहोत. मात्र, हे असेच चालत राहिले तर काम लवकर बंद पडेल,’ अशी भीती उद्योजक शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केली.
उद्योगांची मागणी काय ?
‘सध्या लघुउद्योगांसमोर उद्योग टिकवण्याचे आव्हान आहे. वाढत्या खर्चामुळे महिला उद्योजक अधिक अडचणीत आहेत. उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वेगवेगळे कर, वीजदेयके भरण्यासाठी सुलभ हफ्ता योजना आणावी, लघुउद्योगांना विशेष आर्थिक सहाय्य करावे,’ अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर आणि दुर्गा भोर यांनी पत्रकार परिषदेत केली.
