पुणे : ‘सर्पदंशाची घटना घडल्यानंतर वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य असल्याचे पुणे जिल्ह्यातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२४ ते जुलै २०२६ या २८ महिन्यांत जिल्ह्यात सर्पदंशाच्या ३,०८४ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ३,०८२ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला,’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन देवमाने यांनी दिली आहे. ‘मंचर, चांदोली, भोर आणि जुन्नर परिसरात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विश्लेषणातून समोर आले आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि शेतातील कामांदरम्यान सर्पदंशाचा धोका वाढतो. या परिसरात विषारी आणि बिनविषारी सापांचा वावर असल्याने नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’ असे देवमाने यांनी सांगितले.

राज्य सरकारने सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’ म्हणून समावेश केल्याने त्या बाबतची माहिती संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि क्लिनिकना सर्पदंशाच्या प्रत्येक रुग्णाची नोंद प्रशासनाकडे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमधील अँटी-स्नेक व्हेनम (एएसव्ही) औषधसाठ्याची माहितीही नियमितपणे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कोणत्या भागात सर्पदंशाच्या घटना अधिक घडत आहेत, त्यानुसार उपचारांसाठी आवश्यक औषधसाठ्याचे नियोजन करणे शक्य होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

‘सर्पदंश झाल्यानंतर घरगुती उपचार, अंधश्रद्धा किंवा तांत्रिक-मांत्रिकाचा आधार न घेता रुग्णाला त्वरित जवळच्या शासकीय किंवा अधिकृत रुग्णालयात दाखल करावे,’ असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. वेळेत मिळणारे योग्य वैद्यकीय उपचार आणि ‘एएसव्ही’चा वापर यामुळे सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात.

ग्रामीण भागात उपचारांची सोय

सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘एएसव्ही’चा साठा उपलब्ध ठेवण्यात येत आहे. या केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून रुग्णाला शहरातील मोठ्या रुग्णालयात नेण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन उपचार तातडीने सुरू करता येत आहेत.